Sunday, March 26, 2023

लहान बाळ अंगावर असणे चांगले की वाईट?

 नमस्कार मित्रांनो, मला २१ महिन्याचं बाळ आहे. बाळ माज्या अंगावर आहे, आता अंगावर असणे म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न बहुतेक जणांना पडला असेल, विशेषतः ज्यांना बाळ नाही. 

तर थोडक्यात सांगायचं झालं तर, बाळ माज्या अंगावर जास्त खेळणे, मी दिसलो कि लगेच माज्याकडे धावत येणे, मिठी मारणे आणि त्याला मी घेण्यासाठी तो देहबोली करून सांगण्याचा प्रयत्न करणे कि बाबा मला घ्या, उचला मला. बाळ खेळण्यासाठी अंगावर चढणे, खांद्यावर बसने, पोटावर बसने, अंगावर चढून उडी मारणे अश्या प्रकारे बाळ अंगावर खेळणे, अश्या प्रकाराला म्हणतात बाळ जास्त अंगावर असणे.


बाळ अंगावर असणे हे चांगले कि वाईट याला विविध विचार प्रवाह असू शकतात.

काही विचार प्रवाह बाळ अंगावर असणे चांगले नाही असे मानतात, त्याला विविध वैध कारणे सुद्धा आहेत. सर्वसामान्यपणे दोन्ही पालक नोकरदार असणारे, त्यांना हा विचारप्रवाह योग्य वाटतो. नोकरदार पालकांना वेळ खूप महत्वाचा, ते बाळासोबत जास्त वेळ खेळू शकत नाही, किमान हफ्त्यातले ५ दिवस तरी ते जास्त वेळ बाळाला देऊ शकत नाही. अश्यात बाळ जर अंगावर असेल तर त्रास खूप जास्त, अंगावर असलेल्या बाळाला जास्त वेळ द्यावा लागतो, त्याच्यासोबत खेळावं लागत, तुम्ही त्याला दिसले कि बाळ तुमच्याकडे धावत येणार म्हणजे येणार आणि त्याला तुम्ही घेण्याची बाळ मागणी व हट्ट सुद्धा करणार. अश्यात जर तुम्ही बाळाला जवळ घेतले नाही तर बाळ रडतो आणि चिडचिड करतो. तर नोकरदार पालकांना बाळ अंगावर असणे चुकीचे वाटणे यात काही गैर नाही. पालकांच्या कामाचे स्वरूप आणि वेळ यावर विचारप्रवाह बदलत असावा. नोकरदार पालक सुरवातीपासूनच बाळाला अंगावर होऊ देत नाही, कारण त्यांना माहित असत, आपल्या कामाच्या स्वरूपामुळे आपल्याकडे जास्त वेळ नसणार आहे, त्यामुळे बाळाला आधीपासूनच अंगावर न होऊ देण्याची तालीम दिली जाते. असा माझा प्राथमिक अंदाज आहे

दुसरा अंदाज असा मला वाटतो, कदाचित पालक विचार करत असतील की बाळ वाईट शिष्टाचार (बॅड मन्नेर्स) जोपासेल किंवा अंगावर खेळणे म्हणजेच वाईट शिष्टाचार आहे. शिष्टाचार हा समाजातील विभिन्न गटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जोपासला जातो. कदाचित अतिशय श्रीमंत कुटुंबात बाळ अंगावर खेळणे हा वाईट शिष्टाचार मानला जात असेल, मध्यमवर्ग कुटुंबात याउलट विचारप्रवाह असू शकतात. असे शिष्टाचाराचे अनेक विरोधाभासी उदाहरणे आपण देऊ शकतो.

आता या सगळ्यात पालक काही गमावत आहेत का? असा प्रश्न मला पडला, थोडा विचार केला आणि जे विचार मला सुचले ते मी पुढे मांडत आहे.

बाळ जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंतच ते माझ्या अंगावर खेळेल, एकदा का ते थोडं मोठं झालं आणि त्याला थोडी समज-उमज आली कि ते जस आज माझ्या अंगावर खेळत आहे तस ते खेळेल का? किती जणांना वाटत कि बाळ मोठं झालं कि ते अंगावर जस आज खेळत आहे तसच मोठं झाल्यावर खेळेल? तुमची उत्तर कंमेंट करून सांगा. मला वाटते ते नाही खेळणार, आज त्याला समज-उमज नाही, ते अगदी निखळ, स्वछंद, निस्वार्थी, निरागस आहे म्हणून ते माज्या अंगावर उड्या मारत आहे, समज-उमज असलेलं मुलं ते करू शकेल का? आज आपण आपल्या आई-वडिलांच्या अंगावर या बाळाप्रमाणे खेळू शकतो का? कितीही कुणाची इच्छा असली तर ते आज अशक्य आहे.

बाळ किती काळ अंगावर खेळेल, तर मला वाटते कि १.५ वर्ष ते ३.५ वर्ष पर्यंतच ते या टप्प्यात राहील, आणि जस बाळाचा वयोमान वाढेल त्याप्रमाणे वजन सुद्धा, ४ वर्ष नंतर आपल्यालाच बाळाला उचलायचा कठीण होणार आहे. मग तुमची इच्छा असो वा नसो, बाळाला खांद्यावर घेऊन खेळणे अशक्यच होणार आहे. जर बाळाच्या व आपल्या जीवनाचा हा टप्पा मर्यादित काळासाठीच (Limited Validity Voucher) आहे तर आपण अमूल्य अश्या आनंदाचा लाभ का घ्यायला नको (Priceless Voucher/Topup). जोपर्यंत बाळ बोलायला सुरवात करत नाही तोपर्यंत आणि त्यानंतरही, स्पर्श हि एकप्रकारे भाषेचीच जागा घेते कारण लहान मुले त्वचेपासून त्वचेच्या संपर्कास जास्त प्रतिसाद देतात. स्पर्श बाळाच्या निरोगी वाढ आणि विकासाला चालना देतो. आपलेपणाची भावना निर्माण करतो.

माझं बाळ अंगावर जास्त होऊ न देण्याच्या विचार प्रवाहाला विरोध नक्कीच नाही, हा ज्याचा त्याचा पालकांचा वयक्तिक प्रश्न आहे. तुमचे विचार कंमेंट करून कळवा, आपण या विषयावर आणखी सकारात्मक गप्पा  मारूया.

1 comment:

  1. खूप छान विचार मांडलेत तुम्ही

    ReplyDelete